अहिल्यानगर : सर्वाधिक उसाचे क्षेत्र असलेल्या नेवासा तालुक्यात दोन वर्षांपासून नगदी पिके घेण्याचा सपाटा सुरू झाल्याने सध्या मुळा धरण काठोकाठ भरले असले, तरी त्या तुलनेत उसाची लागवड झाली नाही. सहा महिन्यांपासून कांद्याला चांगला भाव असल्याने शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल वाढला आहे.
सकाळमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, नेवासे तालुक्यातील देडगाव, जळका, जेऊर हैबती व तेलकुडगाव परिसरात मोठ्या प्रमाणात कांद्याचे रोप टाकून लागवडी अंतिम टप्प्यात आल्या आहेत. कपाशीचे पीक निघाल्यानंतर एकाच वेळी लागवड सुरू झाल्याने मजूर भेटण्यात अडचणी आल्या होत्या. घरचे रोप असलेल्या शेतकऱ्यांना तीस ते पस्तीस हजार रुपये एकरी खर्च आला, तर विकत रोप घेणाऱ्यास एकरी पन्नास हजार रुपये खर्च आला आहे. जिरायत पट्टा म्हणून प्रसिद्ध असलेल्या धनगरवाडी, मोरया चिंचोरे, लोहगाव, वांजोळी, तसेच राजेगाव भागात कांदा लागवड झाली. घोडेगाव येथील उपबाजारात सध्या अंबड, जालना, पैठण भागातून लाल कांदा येत असून, लिलावात सोमवारी व बुधवारी एक लाख कांदा गोण्या आल्या होत्या, असे आडतदार संतोष वाघ यांनी सांगितले.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.