अहिल्यानगर : केंद्रीय सहकार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव तथा राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाचे (एनसीडीसी) व्यवस्थापकीय संचालक पंकजकुमार बंसल यांनी ज्ञानेश्वर उद्योग समूहाला भेट देऊन पाहणी केली.लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाच्या विविध विभागांना त्यांनी भेटी दिल्या. एनसीडीसीचे कार्यकारी संचालक बंसल यांच्यासोबत ‘एनसीडीसी’चे पुणे विभागीय संचालक कर्नल विनीत नारायण हे उपस्थित होते. साखर कारखान्यातून होणारी साखर निर्मिर्ती, सी- हेवी व बी- हेव्ही मोलासेस, सहवीज निर्मिती प्रकल्प, इथेनॉल निर्मिती प्रकल्प, इहॅपोरेशन प्रकल्प, इंसनरेशन बॉयलर प्रकल्पाची पाहणी केली.
कारखान्याचे अध्यक्ष नरेंद्र घुले पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. अध्यक्ष घुले-पाटील व कार्यकारी संचालक अनिल शेवाळे यांनी त्यांना कारखान्याच्या योजनांची माहिती दिली. यावेळी बंसल यांनी ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना ५० वर्षापासून सहकार क्षेत्रात चांगले काम करीत आहे. त्या माध्यमातून परिसरात सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्तर कसा उंचावला याची पाहणी केली. कारखान्याने १२५० मेट्रिक टनावरून प्रतिदिन ९००० मेट्रिक टन ऊस गाळप क्षमता वाढ, केंद्र सरकारच्या धोरणाला प्रतिसाद देत सहविज निर्मिती प्रकल्प व इथेनॉल निर्मिती प्रकल्प कार्यान्वित केले. शेतकऱ्यांना वैयक्तिक उपसा सिंचन योजनेकरिता पाणी परवाने मिळवून देऊन पाईपलाईनकरिता बँक कर्ज उपलब्ध करून दिले याची माहिती घेतली. उपाध्यक्ष पांडुरंग अभंग, संचालक अॅड. देसाई देशमुख, काकासाहेब नरवडे, काकासाहेब शिंदे, अशोक मिसाळ, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सचिव रवींद्र मोटे, प्रशासकीय अधिकारी कल्याण म्हस्के उपस्थित होते.