अहिल्यानगर : ऊस दराच्या संदर्भात जिल्ह्यातील साखर कारखानदारांची येत्या आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक लावण्याचे आश्वासन साखर सहसंचालकांनी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना लेखी पत्राद्वारे दिले आहे. ऊस दराचा प्रश्न संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात आहे. त्यामुळे त्याचे संपूर्ण अधिकार जिल्हाधिकारी व साखर सहसंचालक यांच्याकडे आहेत. त्यामुळे ऊस दरासंदर्भात शेवगाव तहसील कार्यालयात प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याऐवजी जिल्हा स्तरावर बैठक घेण्यात येणार आहे.
शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, सोमवारचे शेतकरी संघटनेचे नियोजित आंदोलन मागे घेण्यात आले आहे. प्रांतधिकारी प्रसाद मते, तहसीलदार प्रशांत सांगडे व शेवगाव पोलिस निरीक्षक समाधान नागरे यांनी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून ऊस दराचा तिढा सोडवण्याची विनंती केली आहे. ऊस दरासंदर्भात लवकरच जिल्हाधिकारी, साखर कारखानदार व शेतकरी संघटनेचे पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करून सर्व सहमतीने तोडगा काढू, असे लेखी पत्र अहिल्यानगरचे प्रादेशिक सहसंचालक संतोष बिडवाई यांनी दिले. त्यामुळे सोमवारचे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.