अहिल्यानगर : यंदा उसाची वाढ चांगली झाली आहे. त्यामुळे एकरी उत्पादनात वाढ होईल, तसेच गाळपाचे उद्दिष्ट देखील साध्य होईल. त्यामुळे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने यंदा साडेसहा लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी केले. कारखान्याच्या गळीत हंगामाचा प्रारंभ करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोक काळे होते. केंद्र सरकारने उसाची एफआरपी वाढविण्याचा योग्य निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय दिला. आता साखरेच्या किमतीतदेखील वाढ करावी, अशी मागणी त्यांनी केली.
आमदार काळे म्हणाले की, केंद्र सरकारने १९८७ च्या ज्यूट पॅकिंग कायद्याच्या आधारे साखरेचे पॅकिंग ज्यूट बॅगमध्ये करण्याचा आग्रह धरला आहे. परंतु, साखरेचे पार्किंग हे ज्यूट बॅगमध्ये करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे साखरेचे पॅकिंग करण्याबाबत कारखान्यांना अन्य पर्यायाचा निवड करण्याची मुभा द्यावी. आमदार काळे व त्यांच्या पत्नी चैताली, संचालक मंडळातील सदस्यांच्या हस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकून गळितास प्रारंभ करण्यात आला. शंकरराव अशोक रोहमारे, राजेंद्र चव्हाण, जाधव, कारभारी आगवण, नारायण मांजरे, पद्माकांत कुदळे, संभाजी काळे, दौलतराव मोरे, सुभाष गवळी, कार्यकारी संचालक सुनील कोल्हे, ज्ञानेश्वर आभाळे, बाबा सय्यद, संदीप शिरसाठ, निवृत्ती गांगुर्डे, सूर्यकांत ताकवणे, सोमनाथ बोरनारे आदी उपस्थित होते.