अहिल्यानगर : सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्यास चालू गळीत हंगामात गाळपास आलेल्या उसाचा पहिला हप्ता २८०० रुपये प्र. मे. टनाप्रमाणे येत्या दोन-तीन दिवसात सभासद शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी दिली.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नागवडे यांनी म्हटले आहे की, सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना ऊस भावामध्ये आतापर्यंत कधीही मागे राहिलेला नाही. चालू २०२४ – २५ या गळित हंगामास येणाऱ्या उसाला पहिला हप्ता रुपये २८०० प्र. मे. टनाप्रमाणे देण्यात येणार आहे. नागवडे कारखान्याने सातत्याने दिलेल्या शब्दाप्रमाणे चांगला ऊस दर व इतर पूर्तता केलेली असून सभासद व ऊस उत्पादकांचा विश्वास संपादन केलेला आहे. जिल्ह्यात इतर कारखान्यांच्या तुलनेत नागवडे कारखाना ऊस भावात मागे राहणार नाही असे नागवडे म्हणाले. शेतकऱ्यांनी ऊस भावाबाबत कुठल्याही प्रकारची शंका मनामध्ये न ठेवता नागवडे सहकारी साखर कारखान्यास जास्तीत जास्त ऊस देऊन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता सहकार्य करावे, असे आवाहन चेअरमन राजेंद्र नागवडे, व्हा. चेअरमन बाबासाहेब भोस व संचालक मंडळाने केले आहे.