अहिल्यानगर : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने येथील डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक (साखर) संतोष बिडवई यांनी कारखान्याचे प्राधिकृत अधिकारी व कार्यकारी संचालकांना संस्था सभासद यादी सादर करण्यास कळवले आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने ३ जानेवारी रोजी दिलेल्या आदेशानुसार जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांनी कारखान्याचे प्राधिकृत अधिकारी व कार्यकारी संचालकांना पुढील प्रक्रियेबाबत सूचना दिल्या आहेत. कारखाना दोन वर्षांपासून बंद आहे. जिल्हा सहकारी बँकेने थकीत कर्जापोटी कारखान्याच्या मालमत्तेचा ताबा घेतला आहे. शासनाने संचालक मंडळ बरखास्त करून प्राधिकृत अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे.
तनपुरे साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी चार वेळेस निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. परंतु बँकेचे प्रयत्न फोल ठरले. यांदरम्यान कारखाना बचाव कृती समितीने कारखाना सुरू व्हावा आणि निवडणूक प्रक्रिया राबवली जावी यासाठी प्रयत्न केले. याबाबत तनपुरे साखर कारखाना बचाव कृती समितीचे समन्वयक अमृत धुमाळ यांनी सांगितले की, कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यासाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावर येत्या २२ तारखेला सुनावणी आहे. त्यामुळे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणातर्फे कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान, कारखान्याच्या सभासद संस्थांची मतदार यादी तयार करण्यासाठी प्रथम संस्था प्रतिनिधींचे ठराव सभासद संस्थांकडून मागविणे आवश्यक आहे. त्यासाठी १ जानेवारी ही मुदत निश्चित केली आहे. यादी देण्यासाठी २० जानेवारी ही अंतिम तारीख आहे.