अहिल्यानगर : जिल्ह्यातील सहकारी आणि खासगी अशा ९ कारखान्यांकडून पहिल्या तीन महिन्यांच्या टप्प्यात ३.५ कोटी लिटर इथेनॉलचा तेल कंपन्यांना पुरवठा करण्यात आला. यंदाच्या हंगामात साजन आणि राहुरी वगळता इतर खासगी व सहकारी अशा २० कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला. सध्या जिल्ह्यातील १० कारखाने बंद झाले आहेत. सद्यस्थितीत गाळप हंगाम शेवटच्या टप्प्यात आहे. यंदा एक कोटी २१ लाख ४२ हजार ४७१ मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात आले असून एक कोटी १९ लाख ५८ हजार ८४२ क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात १ कोटी २० लाख ६० हजार ४८३ क्विंटल साखर उत्पादित झाली होती.
इथेनॉलचा बाजारभावानुसार एका लिटरचा दर ६०.७३ रुपये असून या उपपदार्थातून कारखान्यांना सुमारे २०० कोटींचे उत्पन्न मिळणार असल्याचा अंदाज आहे. अजूनही तीन टप्प्यांत विक्री होणाऱ्या इथेनॉल उत्पन्नामुळे शेतकऱ्यांना वाढीव आणि वेळेवर ऊसदर देणे कारखान्यांना शक्य होणार आहे. यंदा साखर उत्पादनामध्ये होणारी संभाव्य तूट लक्षात घेता देशांतर्गत साखरेचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी आणि साखरेचा पुरेसा पुरवठा राहावा, याकरिता इथेनॉल निर्मितीसाठी साखरेचा आणि सिरपचा वापर करण्यावर शासनाने निर्बंध घातले आहेत. मात्र ‘बी आणि सी- मोलॅसिस’चा वापर करून इथेनॉल निर्मितीची परवानगी देण्यात आलेली आहे. यावर्षी जिल्ह्यातील कारखान्यांनी विशेषतः बी हेव्ही मॉलेसिसवरच इथेनॉल निर्मिती केली आहे. १ नोव्हेंबर २०२३ ते ३१ जानेवारी या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील कारखान्यांनी ३.५ कोटींचे इथेनॉल हे तीन तेल कंपन्यांना विक्री केले आहे.