अहिल्यानगर : अख्ख्य्रा राज्याचे लक्ष लागलेल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि कॉंगेसचे नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अधिपत्याखालील दोन्ही सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत पूर्णशक्तीनीशी एकमेकांचे उट्टे काढणाऱ्या या दोन्ही नेत्यांनी आपापल्या सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकीत मात्र कमालीचे सामंजस्य दाखविले. कारखाना कार्यक्षेत्रातील राजकारणाच्या सारिपाटावर एकमेकांना चेकमेट देण्याऐवजी या दिग्गज नेत्यांनी सहकारातील सहमती एक्स्प्रेसमध्ये बसणे पसंत केले.
विठ्ठलराव विखे-पाटील कारखान्यातील परंपरागत विरोधक असलेल्या प्रवरा शेतकरी मंडळातर्फे एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही. सत्ताधारी आणि प्रशासनाने मिळून विरोधकांना अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागेल, असे वर्तन सुरू ठेवले. त्यामुळे आम्ही जाणीवपूर्वक माघार घेतली, असा दावा मंडळाचे नेते बाळासाहेब केरूनाथ विखे पाटील यांनी केला. उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या २१ जागांसाठी केवळ २१ अर्ज दाखल झाले. त्यामुळे घोषणा बाकी असली, तरी कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले. माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी विखे विरोधकांना पाठबळ दिले नाही, हेही स्पष्ट झाले. येत्या २९ तारखेला अर्ज माघारीची मुदत संपत आहे. त्यावेळी विखे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाल्याची अधिकृत घोषणा होईल. प्रत्यक्षात आजच ही निवडणूक बिनविरोध झाली.
दुसरीकडे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत थोरात विरोधी गटाकडून किंवा महायुतीकडून एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी २१ जागांसाठी तब्बल १३३ अर्ज दाखल झाले. विशेष म्हणजे यातील जवळपास सर्व अर्ज थोरात समर्थकांचे किंवा अपक्ष आहेत. या निवडणुकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना थोरात विरोधकांची मोट बांधून निवडणूक लढविणे शक्य होते. प्रत्यक्षात त्यांनी या निवडणुकीपासून अलिप्त राहण्याची भूमिका घेतली. त्याचा परिणाम म्हणून थोरातांच्या कारखान्याची निवडणूकही बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला. येत्या २९ तारखेला अर्ज माघारीचा शेवटच्या दिवस आहे. त्यावेळी थोरात कारखान्याचे चित्र स्पष्ट होईल.
एकमेकांच्या सहकारी साखर कारखान्यात थेट हस्तक्षेप करायचा नाही, असा अलिखित नियम वर्षानुवर्षे पाळला जातो. मागील लोकसभा निवडणुकीत थोरात यांनी आपली सहकारातील कर्मचाऱ्यांची फौज दक्षिणेत पाठविली. खासदार नीलेश लंके यांना उघडपणे पाठबळ दिले. त्याचा परिणाम म्हणून महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे-पाटील यांचा पराभव झाला. त्यानंतर आलेल्या विधानसभा निवडणुकीत हिंदुत्व आणि लाडक्या बहिणीची त्सुनामी आली. विखे पाटलांनी आपली कार्यकर्त्यांची फौज संगमनेरात उतरविली. नवखे असलेले अमोल खताळ यांच्यामागे शक्ती उभी केली. त्याचा परिणाम म्हणून बाळासाहेब थोरात पराभूत झाले. पराभवाच्या जखमा ताज्या असताना दोन्ही दिग्गजांच्या कारखान्यांच्या निवडणुका आल्या. दोघांनीही एकमेकांच्या विरोधकांना पाठबळ न देण्याची भूमिका स्वीकारली.