अहिल्यानगर : मराठवाडा, विदर्भातील ऊस तोड मजुरांची राज्यभरातील साखर कारखान्यांकडे वाटचाल सुरू झाली आहे. राज्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. मुळात या वर्षी पंधरा दिवस उशिराने साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू होत आहे. त्यामुळे आता अनेक भागांतील मजूर कारखान्याकडे निघून जात आहेत. त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या टक्केवारीवर होण्याची भीती व्यक्त होत आहे. उमेदवारांसह पक्षीय नेते धास्तावल्याचे दिसत आहे. मतदान प्रक्रिया काही दिवसांवर आलेली असताना कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होत असल्याने धांदल उडाली आहे.
राज्यात प्रामुख्याने बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, जालना, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, विदर्भातील जळगाव, चाळीसगाव, भुसावळ, चंद्रपूर, गडचिरोली आदी भागांत अधिक मजूर आहेत. साधारण बारा ते चौदा लाख मजुरांची संख्या असते. राज्यातील साठपेक्षा अधिक विधानसभा मतदारसंघात ऊस तोडणी मजुरांचा प्रभाव आहे. ऊस तोडणी मजूर गेल्या काही दिवासांपासूनच कारखान्यावर जाण्याची तयारी केलेली आहे. खरेतर मतदान झाल्यानंतर साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू करावा, अशी मागणी ऊस तोडणी कामगार, मुकादम युनियनने केली होती. मात्र तसे ठरले नसल्याने मजूर रवाना होत आहेत. दूरवर गेलेल्या मजुरांना मतदानासाठी परत आणताना उमेदवार, पक्षीय नेत्यांची दमछाक होणार आहे.