अहिल्यानगर : तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे १७ महिन्यांचे थकीत पगार, दोन बोनस, १४ ते १८ टक्के फरकाची रक्कम अद्याप मिळालेली नाही. कामगार युनियनने आपली पुढील दिशा ठरविण्यासाठी १५ एप्रिल रोजी कामगारांचा महामेळावा आयोजित केला आहे. त्यात पुढील दिशा स्पष्ट केली जाणार असल्याचे कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले.
युनियनचे अध्यक्ष गजानन निमसे, उपाध्यक्ष अर्जुन दुशिंग, सेक्रेटरी सचिन काळे, माजी अध्यक्ष इंद्रभान व अन्य पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी युनियनच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. जिल्हा बँकेने कारखान्यावर आणलेली जप्ती हा पूर्वनियोजित कट होता असा आरोप कामगारांनी केला.
तुमचा एक रुपया बुडवणार नाही असे आश्वासन खासदार सुजय विखे यांनी वेळोवेळी कामगारांना दिले. मात्र, काहीच झालेले नाही. आम्ही भीक मागत नाही, आमच्या घामाचा थकीत पगार व बोनस द्या. आम्हाला राजकारण करायचे नाही. आठ दिवसांत आमच्या मागण्यांचा विचार करा अन्यथा १५ एप्रिलच्या महामेळाव्यात आमची भूमिका स्पष्ट करू, असा इशारा तनपुरे कामगारांनी दिला. यावेळी सीताराम नालकर, बाळासाहेब तारडे, सुरेश तनपुरे, नामदेव शिंदे, नामदेव धसाळ, रामभाऊ ढोकणे, रावसाहेब दुस, ईश्वर दुधे, राजेंद्र गागरे आदी उपस्थित होते.