अहिल्यानगर : कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याने शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत साखरेच्या घसरलेल्या दराचा विचार न करता २०२४-२५ च्या गळीतास येणाऱ्या उसाला पहिली उचल २,८०० रुपये प्रती मेट्रिक टन देण्याचे जाहीर केले आहे. गाळप झालेल्या उसाचे या दरानुसार, पंधरवाडानिहाय पेमेंट ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन आ. आशुतोष काळे यांनी दिली. गळीत हंगाम सुरु होऊन जवळपास एक महिन्याचा कालावधी पूर्ण होत असताना अहिल्यानगर जिल्ह्यात अद्याप एकाही साखर कारखान्याकडून ऊस दराबाबत निर्णय झालेला नाही. प्रथमच काळे कारखान्याने पहिली उचल जाहीर करत ऊस दराची कोंडी फोडली आहे.
आ. काळे यांनी सांगितले की, कारखान्याने १५ डिसेंबरअखेर १,३८, ४२१ मे. टन उसाचे गाळप करून १,२०,३२५ साखर पोती उत्पादन केले असून साखर उतारा १०.४१ टक्के मिळाला आहे. एका बाजूला उसाच्या एफआरपीत वाढ ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. परंतु दुसरीकडे साखर विक्रीचे घसरलेले दर ही उद्योगासाठी चिंताजनक बाब आहे. साखरेचा किमान विक्री दर ३,६०० रुपये प्रती किंटल करावा, अशी मागणी केंद्र सरकारकडे केलेली आहे. परंतु केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने त्यावर निर्णय घेतलेला नाही. साखरेचे दर हे २०० ते ३०० रुपयांनी कमी झाले आहेत. अशा अवघड परिस्थितीत काळे कारखान्याने ऊस दराबाबत धाडसी निर्णय घेऊन २,८०० रुपये प्रती टन पहिली उचल देण्याचा जिल्ह्यात सर्वप्रथम निर्णय घेऊन प्रत्यक्षात अंमलबजावणीदेखील केली आहे.