अहिल्यानगर : यंदाच्या गळीत हंगामात आतापर्यंत जिल्ह्यातील ८ कारखान्यांचे हंगाम बंद झाले आहेत. एकूण २२ साखर कारखान्यांनी २५ मार्चअखेर १ कोटी २३ लाख ३८ हजार ९०९ मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात आले. तर १ कोटी २१ लाख ८७ हजार ७९२ क्विंटल साखर निर्मिती केली आहे. जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा ९.८८ टक्के आहे.
यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे ऊस व पाण्याची टंचाईने गळीत हंगाम कमी कालावधीचा होईल, अशी स्थिती होती. मात्र, मध्यंतरीच्या अवकाळी पावसाने ऊस उत्पादन वाढले. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात हंगाम बंद होतील, हा अंदाज फोल ठरला. सद्यस्थितीत जिल्ह्यातील १३ सहकारी साखर कारखान्यांनी ७७ लाख १४ हजार ६६५ मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. या कारखान्यांनी ७७ लाख ४५ हजार ५७० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. ९ खासगी साखर कारखान्यांनी ४६ लाख २४ हजार २४४ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ४४ लाख ४२ हजार २२२ क्विंटल साखर निर्मिती केली आहे. त्यामुळे राज्यातील हंगाम एप्रिल अखेरपर्यंत चालण्याची शक्यता आहे.