अहिल्यानगर : पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर इजदे येथील ऊस तोडणी कामगाराचा मुलाने कर निरीक्षकपदी भरारी घेतली आहे. सोमनाथ निवृत्ती खेडकर असे त्यांचे नाव आहे. ऊस तोडणी कामगार असलेल्या आई-वडिलांचे मुलाच्या चांगल्या नोकरीचे स्वप्न साकार झाले आहे. त्याच्या या यशाचे सर्व स्तरातून कौतुक केले होत आहे. पाथर्डी तालुका हा तसा कायम दुष्काळी. त्यात खेडकर कुटुंबाची पाच एकर बरड शेती. त्यात काहीच उगवत नाही. शेतीतून उत्पन्न नसल्याने पोट भरण्यासाठी ऊस तोडणीशिवाय पर्याय नाही. गेली अनेक वर्षे खेडकर कुटुंबिय ऊस तोडणीचे काम करतात.
सोमनाथ यांचे आई-वडील ऊस तोडणीसाठी गेल्याने त्यांना इयत्ता सहावीत सलग दोनदा नापास व्हावे लागले. मात्र, सोमनाथने परिस्थिती बदलण्याचा ठाम निश्चय केला. त्याचे वडील निवृत्ती खेडकर व आई ठकुबाई यांनी हे दोघेही अशिक्षित असले तरी त्यांनी मुलाच्या भविष्यासाठीचे कष्ट उपसले. पोरांनी परिस्थिती बदलवली. त्यांचं सुख तेच आमचं सुख असे म्हणत केलेल्या कष्टाचे चीज झाल्याची भावना व्यक्त केली आहे. सोमनाथचा मोठा भाऊ रामनाथ हा पुणे येथे खासगी कंपनीत काम करतो. सोमनाथने बारावीपर्यंतचे शिक्षण चिंचपूर गावात पूर्ण केले. तर पाथर्डी शहरातील बाबूजी आव्हाड महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेतले. पुण्यात मित्रांबरोबर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. पहिल्याच प्रयत्नात तो सोमनाथ यशस्वी झाला.