अहिल्यानगर : थोरात कारखान्याची निवडणूक बिनविरोध, शेतकरी विकास मंडळाच्या सर्व २१ जागा बिनविरोध

अहिल्यानगर : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखालील शेतकरी विकास मंडळाच्या सर्व जागा बिनविरोध झाल्या आहेत. २१ जागांसाठी एकूण १३३ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. मात्र, इतरांनी त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संगमनेर उपविभागाचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार धीरज मांजरे यांनी काम पाहिले.

नव्या संचालक मंडळात सोसायटी मतदारसंघातून माजी मंत्री बाळासाहेब भाऊसाहेब थोरात हे प्रथम बिनविरोध झाल्यानंतर साकुर गटातून इंद्रजीत अशोकराव खेमनर, सतीश चंद्रभान वर्षे, रामदास लक्ष्मण धुळगंड, जोर्वे गटातून इंद्रजीत पंडितराव थोरात, डॉ. तुषार दिनकर दिघे, विलास गंगाधर शिंदे, तळेगाव दिघे गटातून संपतराव श्रीरंगराव गोडगे, रामनाथ बाळाजी कच, आरगडे नवनाथ धोंडीबा, धांदरफळ गटातून पांडुरंग दामोदर घुले, विजय रामनाथ राहणे, विनोद गणपत हासे, अकोले-जवळे गटातून गुलाब सयाजी देशमुख, संतोष रखमा हासे, अरुण सोन्याबापू वाकचौरे, अनुसूचित जाती जमाती मतदारसंघामधून योगेश निवृत्ती भालेराव तर महिला राखीव मतदार संघामधून लता बाबासाहेब गायकर व सुंदरबाई रावसाहेब डुबे, भटक्या विमुक्त जाती जमाती मतदारसंघामधून दिलीप श्रीहरी नागरे व इतर मागासवर्गीय मतदार संघामधून अंकुश बाळासाहेब ताजणे यांची बिनविरोध निवड झाली.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले कि, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना हा राज्यातील उत्कृष्ट कारखाना असून सर्व सभासद, शेतकरी, ऊस उत्पादक व नागरिकांचा कारखान्यावर मोठा विश्वास आहे. कारखान्याने कायम तालुक्याचे हृदय म्हणून काम करताना तालुक्याच्या विकासात योगदान दिले आहे. संचालक पदासाठी इच्छुक कार्यकर्त्यांची संख्या मोठी होती. हे सर्व कार्यकर्ते तोलामोलाचे आहेत. मात्र, कारखान्याच्या व तालुक्याच्या हिताकरिता माघार घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे व सभासदांचे मी मनापासून अभिनंदन करीत आहे. चांगल्या राजकारणाची परंपरा या सर्वांनी जपली. यापुढेही हीच समृद्ध वाटचाल ठेवून सर्वजण एकत्रित चांगले काम करतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here