अहमदनगर : ऊस दरासाठी हंगाम बंद पाडण्याचा शेतकऱ्यांचा इशारा

अहमदनगर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एफआरपी हाच दर घोषित केल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. कारखान्यांनी गेल्या वर्षाचे ५०० रुपये व यावर्षीची पहिली उचल ३५०० रुपये प्रती टन देणे गरजेचे आहे. नवा दर जाहीर न केल्यास हंगाम बंद पाडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. याप्रश्नी शेतकरी संघटनेच्यावतीने श्रीरामपुरात रास्ता रोको करण्यात आले.

शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, युवराज जगताप, विजय मते यांच्यासह कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. जिल्ह्यातील कारखानदारांनी अद्याप दर जाहीर न केल्याबद्दल उपस्थित शेतकऱ्यांनी तीव्र रोष व्यक्त केला. जिल्ह्यात गाळप हंगाम सुरू होऊन जवळपास एक महिना उलटला आहे. मात्र, एकाही साखर कारखान्याने ऊस दर जाहीर केलेला नाही. किंवा पहिल्या उचलीची घोषणाही केलेली नाही. साखर कारखान्यांनी तत्काळ नवा दर जाहीर करावा. फक्त एफआरपीनुसार ऊस दर आम्हाला मान्य नाही. दर जाहीर न केल्यास आंदोलन तीव्र केले जाईल. गळीत हंगाम बंद पाडू असा इशारा यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here