अहमदनगर : साखर कारखानदार प्रति टन २७०० रुपये दरावर ठाम, बैठक निष्फळ

अहमदनगर : शेवगाव तहसील कार्यालयात मंगळवारी (दि.२१) पाथर्डीचे प्रांताधिकारी प्रसाद मते यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी नेते व साखर कारखानदार यांच्यातील ऊस दराची बैठक निष्फळ ठरली. शेतकरी संघटनेकडून मागील गळीत हंगामातील ३०० रुपये व चालूवर्षीच्या गळीत हंगामात उसाला प्रतिटन ३१०० रुपये पहिला हप्ता मिळावा, या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गेले दोन महिने प्रशासन व साखर कारखानदारांकडे पाठपुरावा केला. १५ नोव्हेंबर रोजी शेवगाव- पैठण रोडवरील आंदोलनावेळी पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाने मध्यस्थी करून २१ नोव्हेंबर रोजी ऊस दराबाबत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले होते.

या बैठकीत साखर कारखानदार प्रति टन २७०० रुपये ऊस दरावर ठाम राहिले. त्यामुळे शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि कारखानदार यांच्यात शाब्दिक चकमक झाली. बैठकीमध्ये कोणताही निर्णय न झाल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व शेतकऱ्यांनी साखर कारखानदारांचा निषेध केला. याबैठकीला प्रांताधिकारी प्रसादमते, तहसीलदार प्रशांत सांगडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पक्ष जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे, संभाजीनगर जिल्हाध्यक्ष माऊली मुळे, रमेश कचरे, बाळासाहेब फटांगडे, दत्तात्रय फुंदे, तालुकाध्यक्ष अशोक भोसले, शेवगाव तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष बबरू वडघणे, शेवगाव तालुका प्रहार संघटनेचे अध्यक्ष रामजी शिदोरे, स्वाभिमान तालुका पक्ष अध्यक्ष प्रशांत भराट, बाळासाहेब गजें, शहराध्यक्ष अमोल देवढे, युवक अध्यक्ष हरिभाऊ कबाडी, मेजर अशोक भोसले यांनी उपस्थित केला. पाचरणे, विकास साबळे, शिवाजी साबळे, घोटण सोसायटीचे माजी चेअरमन लक्ष्मण टाकळकर तसेच परिसरातील शेतकरी उपस्थित होते. साखर कारखानदारांकडून त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here