बारामती : येथील ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्रात १६ ते २० जानेवारी या काळात कृषी २०२५ या प्रदर्शनाचे आयोजन केले जात आहे. या प्रदर्शनात शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार केलेली ऊस शेती पाहण्याची संधी मिळणार आहे. ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, ऑक्सफर्ड विद्यापीठ, मायक्रोसॉफ्ट व ॲग्रीपायलट या संस्थांमधील विविध तज्ञांच्या मदतीने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ऊस शेती हा प्रकल्प राबविला जात आहे. प्रकल्प महाराष्ट्रातील एकूण १००० शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये राबविण्याचा विचार असून पुढील टप्प्यात हा आकडा आणखी वाढणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) चा वापर करून आपण या व अशा प्रकारच्या ऊस शेतीत येणाऱ्या समस्यांवर यशस्वीपणे मात करू शकतो. हाच विचार समोर ठेवून बारामतीच्या अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने जागतिक अग्रगण्य संस्थांबरोबर विशेष संशोधन प्रकल्प सुरू केला आहे.
हा प्रकल्प शेतकऱ्यांनाच नाही तर साखर कारखान्यांना देखील खूप फायदेशीर ठरणार आहे. हे तंत्रज्ञान ऊस शेती व शेतीपूरक व्यवसायांमध्ये अमुलाग्र बदल घडवून आणू शकते असा विश्वास साखर उद्योगाला वाटतो. प्रकल्पांतर्गत इंटरॅक्टिव्ह व यूजर फ्रेंडली डॅशबोर्डच्या मदतीने शेतकऱ्यांना हिट मॅप, सेटलाईट इमेजेस, क्रॉपिंग पॅटर्न रिकमंडेशन सिस्टीम, इरिगेशन मॅनेजमेंट, पेस्ट अँड डिसीज मॉनिटरिंग इत्यादी घटकांची माहिती स्वतःच्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. या शेतीची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून कमी खर्चात ऊस शेती व उत्पादन वाढ हे आहे. कृषीक २०२५ मध्ये शेतकऱ्यांना याची चांगली माहिती मिळू शकेल.