पुणे : महाराष्ट्रात, विशेषतः पश्चिम महाराष्ट्र प्रदेशात उसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर हे जिल्हे खास ऊस लागवडीसाठी ओळखले जातात. तर अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना यांसारखे इतर जिल्हेसुद्धा या नगदी पिकाची लागवड केली जाते. उसाचा वापर साखर आणि इतर उप-उत्पादने तयार करण्यासाठी केला जातो. या ऊस शेतीमध्ये बारामतीच्या कृषी विकास ट्रस्टने अधिक उत्पादनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वापरून भारतातील पहिला प्रयोग केला. ट्रस्ट, मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने कमी खर्चात जास्त पीक देणारी उसाची जात विकसित केली. हा प्रयोग सुमारे १,००० शेतकऱ्यांच्या शेतात उसावर करण्यात आला. त्याच्या वापरामुळे उसाचे उत्पादन ३० ते ४० टक्के वाढले आहे. तर शेतकऱ्यांचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढेल. उत्पादन खर्च २० ते ४० टक्के कमी होईल आणि ३० टक्के पाणी वाचेल. एकूणच एआय हे ऊस शेतीसाठी वरदान ठत असल्याचे दिसून येते.
महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पात सुमारे ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे, ज्याद्वारे आता शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञान वापरासाठी अनुदान मिळेल. एआय वापरून, उसाचे उत्पादन प्रति पीक १६० टनांपेक्षा जास्त वाढवता येते. बारामतीच्या शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये हा प्रयोग तीन वर्षांपूर्वी सुरू झाला होता. मार्च २०२४ पासून १,००० शेतकऱ्यांवर हा प्रयोग करण्यात आला. लवकरच, महाराष्ट्रातील ५०,००० शेतकऱ्यांच्या शेतात हा प्रकल्प स्थापित केला जाईल. असे सांगण्यात येत आहे. एआय तंत्राने पिक उत्पादन वाढले आहे असे या प्रयोगांत सहभागी असलेले दौंड येथील शेतकरी महेंद्र थोरात यांनी सांगितले. माझ्या दोन एकर जमिनीवर मी केलेल्या एआय शेतीतून १३० टन ऊस उत्पादन होईल आणि सुमारे ३०% नफा मिळेल अशी मला आशा आहे. दरम्यान, कृषी विकास ट्रस्टचे विश्वस्त प्रतापराव पवार यांनी या तंत्रज्ञानाच्या विकासासाठई पुढाकार घेतला आहे. ‘सेंटर फॉर एक्सलन्स फार्म वाइब्स’ प्रकल्पाची स्थापना करण्यात आली. ऑक्सफर्ड विद्यापीठाचे संचालक डॉ. अजित जवकर आणि मायक्रोसॉफ्टचे कार्यकारी संचालक डॉ. रणवीर चंद्रा यांच्या मदतीने बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात हा प्रकल्प उभारण्यात आला. अलिकडेच मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी या प्रकल्पाचे कौतुक केले होते.