उसाची काटामारी, साखर उताऱ्याची चोरी रोखण्यासाठीही ‘एआय’चा वापर व्हावा : माजी खासदार राजू शेट्टी यांची मागणी

पुणे : साखर उद्योगात कारखान्यांकडून वर्षानुवर्षे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची उसाच्या वजनात होणारी काटामारी, साखर उताऱ्याची चोरी करून सर्रास लूट होत आहे. ती रोखण्यासाठी राज्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऊस उत्पादनवाढीसाठी वापरल्या जाणाऱ्या नव्या तंत्रज्ञानाप्रमाणे याकडेही लक्ष द्यावे अशी मागणी त्यांनी केली. शेट्टी यांनी मंगळवारी साखर आयुक्त सिद्धाराम सालिमठ यांची भेट घेतली. कृषी विद्यापीठाच्या पाडेगाव ऊस संशोधन केंद्राद्वारे एआय तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी शासनाने प्रयत्न करायला हवा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

राज्यातील सर्व २०० साखर कारखान्यांचे वजनकाटे एआय वापरातून ऑनलाइन करावेत, काटामारी निदर्शनास आल्यास संबंधितांवर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी राजू शेट्टी यांनी साखर आयुक्तांकडे केली. ५०० टनांपेक्षा जादा गाळप केलेल्या शेतकऱ्यांची नावे दिल्यास खातरजमा करणार आणि थकीत एफआरपीप्रश्री विलंबित कालावधीसाठी आम्ही १५ टक्के व्याज घेणारच असे त्यांनी सांगितले. शेट्टी म्हणाले की, चालू वर्षी कारखान्यांच्या गाळप क्षमतेपेक्षा ३० ते ४० टक्के ऊस कमी पडला. त्यामुळे प्रक्रिया खर्चात वाढ होऊन उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे उताऱ्यात झालेली घट ही कागदावर दाखविण्यात येत आहे. साखर गोदामांमध्येच आहे. कारखान्यांकडून उत्पादन घटल्याचे सांगण्यात येत आहे. उताऱ्यात होणाऱ्या चोरीमुळे हे सर्व होत असून, त्यावर कोणीच कारवाई करीत नसल्याचे आम्ही साखर आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले आहे. सर्व शेतकरी नेत्यांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here