सातारा : अजिंक्यतारा कारखान्याने उच्चतम दर देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. आगामी हंगामात गाळपास येणाऱ्या उसालाही किफायतशीर दर देण्यासाठी कटीबध्द असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. ते म्हणाले, सभासद शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळावा आणि त्यांचे आर्थिक जीवनमान उंचवावे, हे स्व. भाऊसाहेब महाराजांचे स्वप्न कारखाना व्यवस्थापनाकडून सत्यात उतरवले आहे.
अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या २०२३- २०२४ च्या गळीत हंगामाकरता यंत्रसामुग्री देखभाल, दुरुस्ती आदी कामे प्रगतीपथावर असून गळीत हंगामाची पूर्व तयारी रोलर पूजन प्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. आ. शिवेंद्रराजे म्हणाले कि, १०० टक्के एफआरपी रक्कम शेतकऱ्यांना वेळेत अदा केली जात आहे. गाळपास आलेल्या ऊसाचे संपूर्ण पेमेंट वेळेत दिल्यामुळे ऊस उत्पादक, सभासद, बिगर सभासदांमध्ये अजिंक्यतारा कारखान्याबाबत विश्वास निर्माण झाला आहे. सभासदांच्या या विश्वासाच्या जोरावर भविष्यात आणखी भक्कम वाटचाल केली जाईल.
यावेळी कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे, व्हा. चेअरमन नामदेव सावंत, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते,जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या माजी सभापती वनिता गोरे, सतीश चव्हाण, किरण साबळे- पाटील, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका कांचन साळुंखे, सुरेश सावंत, सर्व संचालक, कारखान्यातील अधिकारी व कामगार-कर्मचारी उपस्थित होते.
Source : Daily Punyanagari