सातारा : अजिंक्यतारा साखर कारखाना ४ कारखान्यांना कार्यक्षेत्रातून ऊस पुरवठा करतो. या सहकारी साखर कारखान्याने कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या खात्यावर एफआरपीचे सुमारे ३५० कोटी वर्ग केले आहेत. याचबरोबर जावली तालुक्यातील प्रतापगड कारखाना सुरू झाल्याने तेथील शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपये मिळाल्यामुळे त्यांचे जीवनमान उंचावले आहे, असे प्रतिपादन आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी केले. शेंद्रे (ता. सातारा) येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना स्थळावर आयोजित महायुतीच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी सातारा व जावली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने आ. शिवेंद्रराजे भोसले यांचा उच्चांकी गाळप केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री ना. शंभूराज देसाई, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, आ. महेश शिंदे, मनोज घोरपडे, धैर्यशील कदम उपस्थित होते.
आ. शिवेंद्रराजे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या सरकारने इन्कमटॅक्सचा निर्णय रद्द करून साखर कारखान्यांना ताकद दिली आहे. स्व. भाऊसाहेब महाराजांनी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना सुरू केला. त्यांनी लावलेल्या या रोपट्याचा आता वटवृक्ष झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे सहकारमंत्री अमित शहा यांनी इन्कमटॅक्सचे मानगुटीवरील भूत उतरवले. बोंडारवाडी धरण प्रकल्प लवकरच मार्गी लागेल. त्यामुळे ५४ गावांचा प्रश्न सुटेल. उरमोडी धरणाची सातारा तालुक्यातील कालव्यांची कामे पूर्ण झाली आहेत. खोडद बंधाऱ्यापर्यंत पाणी पोहोचल्याने लाभक्षेत्रातील गावांना त्याचा फायदा होत आहे. या कालव्यांची यशस्वी चाचणी नुकतीच घेण्यात आली आहे.