सातारा : शेंद्रेच्या माळरानावर स्व. भाऊसाहेब महाराजांनी लावलेल्या सहकाररूपी रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. साखर कारखाना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण, सक्षम झाला असून तालुक्यातील एक मोठी संस्था बनला आहे. ऊस घालीन तर फक्त अजिंक्यतारालाच, असे ब्रीद आता झाले आहे. याला कारण आपल्या कारखान्याने कमावलेली विश्वासार्हता आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केले. शेवटच्या ११ साखर पोत्यांचे पूजन करून अजिंक्यतारा कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता करण्यात आली. याप्रसंगी आ. शिवेंद्रराजे भोसले बोलत होते.
अजिंक्यतारा साखर कारखान्याने १५६ दिवसांत ७ लाख ५५ हजार मेट्रीक टन गाळप केले आहे. १२.६५ टक्के एवढा उच्चतम साखर उतारा असून ९ लाख २९ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. चेअरमन यशवंत साळुंखे, व्हा. चेअरमन नामदेव सावंत, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, माजी उपाध्यक्ष जि. प. उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, माजी सभापती वनिता गोरे, सरिता इंदलकर, राजू भोसले, सतीश चव्हाण, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश सावंत, कांचन साळुंखे, अरविंद चव्हाण, राहुल शिंदे उपस्थित होते. संचालक विश्वास शेडगे यांनी आभार मानले.