कोल्हापूर : आजरा साखर कारखान्याने या हंगामात कारखान्याचे ४ लाख मेट्रिक टन उत्पादन करण्याचे उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांनी आजरा कारखान्याला जास्तीत जास्त ऊस पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन अध्यक्ष सुनील शिंत्रे यांनी केले. आजरा कारखान्याचा २५ व्या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभप्रसंगी ते बोलत होते. संचालक मधुकर देसाई दाम्पत्याच्या हस्ते पूजा करण्यात आली. प्र. कार्यकारी संचालक व्यंकटेश ज्योती यांनी स्वागत केले.
बसवकिरण स्वामी म्हणाले की, राज्यातील अनेक साखर कारखाने अडचणीत असताना इच्छा व कार्यशक्तीमुळेच आजरा कारखाना पुनरुज्जीवन झाले आहे. कोणीही कारखान्यात राजकारण अथवा प्रतिष्ठा आणू नये. कारण त्याचे दूरगामी परिणाम होत असतात. संचालकांनीही सेवा म्हणून व दक्षतेने काम केले पाहिजे. सर्वांच्या इच्छा व कार्यशक्तीमुळेच आजरा कारखाना पुन्हा उभारला आहे. ‘खासगी’कडून सहकाराकडे आला आहे. हा कारखाना ‘खासगी’कडे जाऊ नये, यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी संचालक वसंतराव धुरे, अंजना रेडेकर, दिगंबर देसाई, सुधीर देसाई, मारुती घोरपडे, अनिल फडके, सुनीता रेडेकर, आनंदा कांबळे, लक्ष्मण गुडूळकर, विजयालक्ष्मी देसाई, तानाजी देसाई, दशरथ अमृते आदी उपस्थित होते. उपाध्यक्ष आनंदराव कुलकर्णी यांनी आभार मानले.