कोल्हापूर : आजरा येथील वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने यावर्षी चार लाख मे. टन ऊस गाळप करण्याचे ठरवले आहे. साखर कारखाना गाळपाचे हे उद्दिष्ट गाठणार का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. संचालक गाळप वाढवण्यासाठी प्रयत्न करत नाही. तर माजी संचालक बाहेरच्या कारखान्यांकडे ऊस पाठवण्यास प्राधान्य देतात. याचाच खरा परिणाम गाळपावर होत आहे.
अध्यक्ष वसंतराव धुरे यांनी गाळप वाढवल्याशिवाय पर्याय नाही. याकरिता तोटा कमी करण्यासाठी धाडसाने नवीन सायलो मशिन बसवली आहे. ४ लाख मे. टनापेक्षा अधिक गाळपासाठी हा निर्णय घेतला असून, कारखान्याला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी संचालक मंडळ जीवाचे रान करेल, असा शब्द सभासदांना दिला आहे. हा विश्वास सार्थ करण्याची जबाबदारी आता सर्व संचालक मंडळाची आहे.
तालुक्यात चित्री, उचंगीसह, आंबेओहळ, सर्फनाला, चिकोत्रा हे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. यामुळे लाभक्षेत्र वाढले आहे. याचा लाभ घेण्याची आवश्यकता आहे. विशेषतः आंबेओहळ, चिकोत्रा प्रकल्पांतील ऊस कारखान्याकडे आणण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे. पेरणोली गटातील बहुतांश ऊस तांबाळे कारखान्याकडे जातो. उत्तूरमधील सेनापती कापशी, तर कोळींद्रेमधील ‘ हेमरस’कडे जातो. यावर्षी संचालक मंडळ चार लाखांचे उद्दिष्ट गाठण्यासाठी किती प्रामाणिक प्रयत्न करते, यावरच कारखान्याचे पुढील भवितव्य ठरणार आहे.