लखनौ : उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांच्या बिघडत्या आर्थिक स्थितीला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप समाजवादी पार्टीचे (सपा) राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी रविवार केला.
यादव म्हणाले, राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. गाळप हंगामातही त्यांच्या पिकाची खरेदी झालेली नाही. आजही साखर कारखान्यांवर कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. थकबाकी असेल तर त्यावर व्याज आकारणीची तरतुद आहे. मात्र, मूळ रक्कम मिळत नसताना व्याज कोण देणार अशी स्थिती आहे.
सध्याच्या सरकारच्या कार्यकाळात शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सर्वाधिक खराब झाल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी यावेळी केला. चुकीच्या व्यवस्थापनामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असल्याचे ते म्हणाले.
उत्तर प्रदेश सरकारच्या म्हणण्यानुसार, गेल्या गळीत हंगामातील ऊस बिलांचे वितरण शंभर टक्के झाले आहे. सध्याच्या चालू हंगामात शेतकऱ्यांना लवकर ऊस बिले मिळावीत यासाठी सरकार पावले उचलत असल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्याच्या पश्चिम विभागात सद्यस्थितीत गाळप हंगाम लांबला आहे. कारण, बहुतांश गूळ, खांडसरी युनीटनी लॉकडाऊनमुळे लागू झालेल्या निर्बंधांमुळे आपले कामकाज बंद केले आहे. परिणामी शेतकऱ्यांनी आपला ऊस गाळप करण्यासाठी साखर कारखान्यांकडे पाठवला आहे.