छत्रपती संभाजी नगर : मागील पंधरा वर्षांपासून बंद असलेल्या व अनेक अडचणींवर मात करून सुरू करण्यात आलेल्या जय हिंद शुगर प्रा.लि. संचालित गंगापूर साखर कारखान्याने २ हजार ७११ रुपयांचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर मंगळवारी (दि.१६) जमा केला आहे. गंगापूर साखर कारखान्यामध्ये गत ३१ डिसेंबरपर्यंत गाळपासाठी आलेल्या सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाची पहिली उचल २ हजार ७११ रुपयांप्रमाणे त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे. इतर साखर कारखान्यांच्या तुलनेत चांगला भाव मिळत असल्याने तालुक्यातील उस उत्पादकांसह उसतोड मंजूरांमध्ये उत्साह दिसून येत आहे.
सुरुवातीला तोडणी वाहतूक यंत्रणेची आलेली अडचण आता दूर झाली असून, त्यासाठी चार स्वयंचलित तोडणी यंत्र व २०० बैलगाड्यांची व्यवस्था करण्यात आल्याचे कारखान्याच्या वतीने सांगण्यात आले. पुढील दोन महिन्यांत कारखान्याने २ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवल्याची माहिती जयहिंद शुगर गंगापूर युनिटच्या अध्यक्षा डॉ. सुस्मिता विखे-माने यांनी दिली. त्यामुळे तालुक्यासह परिसरातील ऊसउत्पादक शेतकऱ्यांनी त्यां चा ऊस गंगापूर सहकारी साखर कारखान्यासाठी राखीव ठेवून जास्तीत जास्त गाळप करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष कृष्णा पाटील- डोणगावकर यांनी केले आहे.