सोलापूर : आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला पैसा कमी पडू देणार नाही. अशासकीय संचालकांनी शेतकऱ्यांची व कर्मचाऱ्यांची हित डोळ्यापुढे ठेवून काम करून प्रा. शिवाजीराव सावंत व मंत्री तानाजीराव सावंत यांचा विश्वास सार्थ करावा, असे आवाहन माढा पंचायत समितीचे माजी सदस्य पृथ्वीराज सावंत यांनी केले. कारखान्याच्या २८ व्या बॉयलर प्रदीपन सोहळा प्रसंगी ते बोलत होते. प्रशासकीय संचालक महेश चिवटे यांच्या सुविद्य पत्नीसह विधिवत होम हवन करून बॉयलर पूजा करण्यात आली. ‘आदिनाथ’चे माजी व्हाईस चेअरमन रमेश कांबळे, माजी संचालक हरिदास केवारे, प्रा. रामदास जोड, प्रा. शिवाजीराव बंडगर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
‘आदिनाथ’चे प्रशासकीय मंडळ अध्यक्ष बाळासाहेब बेंद्रे म्हणाले की, कारखान्याकडे २०१८-१९ मधील शेतकऱ्याची प्रती टन ९० रुपये दराने जवळपास अडीच कोटी रुपयांची रक्कम थकबाकी होती. ही रक्कम देण्याचा निर्णय प्रशासक मंडळाने घेतला आहे. यावर्षी कारखान्याने चार लाख टन उसाच्या गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. महेश चिवटे म्हणाले की, कारखान्यात शिल्लक साडेपाच हजार पोते साखर विकून शेतकऱ्यांना प्रलंबित देणी दिली जाणार आहेत. आगामी तीन वर्षाचा आराखडा तयार केला आहे. कारखान्याचे विस्तारीकरण व डिस्टीलरी, इथेनॉल प्रकल्प सुरू करण्याला प्राधान्य दिले जाईल. संजय गुटाळ यांनी तालुक्यातील साखर कारखान्यांपेक्षा प्रती टन ५१ रुपये जादा दर आदिनाथ कारखाना देईल, असे सांगितले. यावेळी कार्यकारी संचालक अरुण बागनोर यांनी आभार मानले.