पुणे : जिल्ह्यातील यशवंत सहकारी साखर कारखान्याची एकेकाळी उत्कृष्ट कारखाना म्हणून ओळख होती. या कारखान्यास पुन्हा एकदा उर्जितावस्थेत आणण्यासाठी आणि तो पूर्ववत सुरू करण्यासाठी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने अध्यक्ष या नात्याने पूर्णपणे सहकार्याची भूमिका राहील, असे आश्वासन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिले.
इंदापुरात यशवंत कारखान्याच्या नूतन संचालकांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची भेट घेऊन सत्कार केला. त्यावेळी पाटील बोलत होते. पुढारीमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, यावेळी यशवंतचे नवनिर्वाचित संचालक योगेश काळभोर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी शिवदास काळभोर, लोणी काळभोरचे माजी उपसरपंच अण्णासाहेब काळभोर, लोणी काळभोर विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब काळभोर, माजी उपाध्यक्ष बापुसाहेब काळभोर आदी उपस्थित होते.