कोल्हापूर : कागल तालुक्यातील लोकनेते सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये १६ जानेवारी ते ९ मार्च २४ अखेर देय असलेली ऊस बिले, तसेच तोडणी-वाहतुकीची सर्व बिले अदा केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष खा. संजय मंडलिक यांनी दिली.
खा. मंडलिक यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, संपलेल्या या हंगामात ४ लाख ३५ हजार २४५ टन उसाचे गाळप करून ५ लाख २ हजार ५०० क्विटल साखरेचे उत्पादन केले आहे. सरासरी साखर उतारा ११.५५टक्के इतका राहिला आहे. या गळीत हंगामामध्ये गाळप झालेल्या उसापैकी दि. १६ जानेवारी ते ९ मार्च २०२४ अखेर (हंगाम बंद अखेर) या कालावधीतील एकूण १ लाख ८९ हजार १८३ टन उसाची प्रती टनास ३१५० रुपयाप्रमाणे होणारी रक्कम ५९ कोटी ५९ लाख ३० हजार व त्याचप्रमाणे ऊस तोडणी – वाहतुकीची संपूर्ण बिले संबंधित ऊस पुरवठादार शेतकरी आणि संबंधित कंत्राटदारांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहेत. याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष शिवाजीराव इंगळे, संचालक प्रकाश पाटील, आनंदराव फराकटे, धनाजी सयणकर, विरेंद्र मंडलिक, सत्यजित पाटील, कैलास आधव, महेश घाटगे, ईगल प्रभावळकर व इतर संचालक तसेच कार्यकारी संचालक एन. वाय. पाटील उपस्थित होते.