पुणे : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इथेनॉल प्रकल्प उभारणीबाबतचे खोटे प्रोसिडिंग लिहून साखर आयुक्तालयाच्या परवानगीने २४० केएलपीडीचा इथेनॉल प्रकल्प उभारण्याचा घाट घातला आहे असा आरोप कारखान्याचे ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांनी पत्रकार परिषदेत केला. या वेळी संचालक अँड. जी. बी. गावडे, शशिकांत कोकरे, राजेश देवकाते, युवराज तावरे, रमेश गोफणे, अशोक सस्ते, रोहित जगताप, चिंतामणी नवले, सत्यजित जगताप, रणजित जगताप आदी उपस्थित होते. दरम्यान, कारखान्याच्या विरोधकांना कोणताच मुद्दा नसल्याने इथेनॉल प्रकल्प विस्तारीकरणाच्या मुद्द्यावरून सभासदांची दिशाभूल करीत आहेत असे प्रत्युत्तर कारखान्याचे अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप, उपाध्यक्ष तानाजीराव देवकाते यांनी पत्रकार परिषदेतून दिले आहे.
याबाबत विरोधी गटाचे ज्येष्ठ संचालक चंद्रराव व रंजन तावरे म्हणाले, मागील वार्षिक सर्वसाधारण सभेत इथेनॉलचा २४० की ५०० केएलपीडी प्रकल्प उभा करायचा याबाबत उपस्थित सभासदांत एकमत झाले नाही. त्यावेळी विशेष सर्वसाधारण सभा घेऊन याबाबत जो निर्णय सभासद घेतील तो मान्य करायचा, असे ठरले होते. मात्र, सत्ताधाऱ्यांनी सभेचे चुकीचे व खोटे इतिवृत्त लिहून साखर आयुक्तालयाकडे पाठवत केएलपीडी इथेनॉल प्रकल्प उभा करण्याचा घाट घातला आहे. याबाबत कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील गावांत जाऊन सभासदांमध्ये जागृती करणार आहे. ५०० केएलपीडीचा इथेनॉल प्रकल्प उभारला, तर प्रतिलिटर १५ रुपयांप्रमाणे फायदा होईल.
दरम्यान, कारखान्याचे अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप, उपाध्यक्ष तानाजीराव देवकाते यांनी हे आरोप फेटाळले. ते म्हणाले की, माळेगावने राज्यात उच्चांकी दर दिला. राज्य शासनाने निर्देश दिल्याने तोडणी व वाहतुकीमध्ये ३४ टक्के वाढ करावी लागली. त्यामुळे २०० रुपये प्रतिटन खर्चात वाढ झाली. केंद्र शासनाच्या इथेनॉल निर्मिती धोरणामुळे १०० रुपये प्रतिटन कमी मिळाले. यामुळे एकूण ३०० रुपये प्रतिटन सेटबॅक बसला. अन्यथा माळेगावने ३९३६ प्रतिटन ऊस दर दिला असता. विरोधक २४० की ५०० केएलपीडी इथेनॉल प्रकल्प याबाबत सभासदांची दिशाभूल करीत आहेत. २४० केएलपीडी प्रकल्प व्यावहारिक ठरतो. साखर निर्मिती तसेच उपपदार्थ निर्मिती मोठ्या प्रमाणात घेऊन आपणाला समतोल साधता येईल. यातून सभासदांना अधिकचा ऊस दर देता येईल. यावेळी संचालक तानाजीकाका कोकरे, मदननाना देवकाते, सुरेश खलाटे, योगेश जगताप, राजेंद्र ढवाण पाटील, अनिल तावरे, स्वप्नील जगताप, संजय काटे, प्रताप आटोळे आदी उपस्थित होते.