कोल्हापूर : भोगावती सहकारी साखर कारखाना सभासदांच्या मालकीचा राहावा म्हणूनच या निवडणुकीत काँग्रेससह शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी आणि जनता दल राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र आलो आहे. विकासाच्या मुद्दयावर भविष्यातही ही आघाडी कायम राहील, असा विश्वास आ. पी. एन. पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
शासकीय विश्रामगृहावरील आयोजित या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, ‘शेकाप’चे क्रांतिसिंह पवार-पाटील, अक्षय पवार-पाटील, केरबा पाटील, सरदार पाटील, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, प्रा. किसन चौगुले, बाजार समिती सभापती भारत पाटील, पी. डी. धुंदरे, कृष्णराव किरुळकर, व्हा. चेअरमन उदयसिंह पाटील, बी. के. डोंगळे, दिगंबर मेडसिंगे आदींसह चारही पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील सहा साखर कारखाने खासगी झाले. केवळ दीड कोटीमध्ये उभा केलेला भोगावती कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा राहावा, यासाठीच आम्ही एकत्र आलो आहे. गेल्या ६ वर्षांतील अडचणीवेळी जिल्हा बँकेचे चेअरमन व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा बँकेतून आर्थिक मदत केली, असे त्यांनी सांगितले.. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी राजकीय संघर्ष बाजूला ठेवून सभासद हितासाठीच सर्वजण मनाचा मोठेपणा दाखवत एकत्र आले आहेत. अशा भूमिकेतूनच भविष्यातही नव्या पिढीला चांगल्या कामासाठी एकत्र आणूया असे सांगितले. शेकापचे केरबा भाऊ पाटील, माजी आ. संपतराव पवार-पाटील यांचे चिरंजीव क्रांतिसिंह पवार-पाटील यांनी आपली भूमिका मांडली.