कोल्हापूर : आजरा तालुक्यातील गवसे येथील वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याच्या २०२४- २५ या गळीत हंगामाकरिता ४ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार कारखान्यास आवश्यक सक्षम तोडणी वाहतुकीचे करार करण्यात येत आहेत. ज्या वाहतूकदारांचे कराराच्या कागदपत्रांची पूर्तता झाली, अशा वाहतूकदारांना कारखाना संचालक व अधिकाऱ्यांच्या हस्ते आगावू पहिल्या हप्त्याच्या धनादेशाचे वाटप केले जात आहे. बीड भागातील तोडणी वाहतूक करार पूर्ण केलेल्या वाहतूकदारांना ॲडव्हान्सचे वाटप करण्यात आले, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष वसंतराव धुरे यांनी दिली.
अध्यक्ष वसंतराव धुरे यांनी सांगितले की, कारखान्याकडून आजरा, गडहिंग्लज, चंदगड या भागातील ऊस नोंदणीचे काम सुरू आहे. ऊस गाळपाकरिता आणण्यासाठी प्राधान्याने स्थानिक यंत्रणा करण्याचे धोरण संचालक मंडळाने आखले आहे. त्याकरिता स्थानिक तोडणी वाहतूक यंत्रणेचे करार करण्याचे काम सुरू आहे. कंत्राटदारांनी शेती कार्यालयाशी संपर्क साधून करार करावेत. यावेळी संचालक मुकुंदराव देसाई, मारुती घोरपडे, दीपक देसाई, रणजित देसाई, राजेश जोशीलकर, अशोक तर्डेकर, हरी कांबळे, रशीद पठाण, प्र. कार्यकारी संचालक व्यंकटेश ज्योती. मुख्य शेती अधिकारी युवराज पाटील, भूषण देसाई उपस्थित होते.