पुणे : राज्यात यंदा आठ लाख टनांपर्यंत अतिरिक्त साखर उपलब्ध होईल. ही अतिरिक्त साखर इथेनॉलकडे वळविण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (विस्मा) केली आहे. महाराष्ट्रात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे मध्य, मराठवाडा, विदर्भातील ऊस उत्पादकता वाढलेली आहे. सुक्रोजचे प्रमाण १० ते १२ टक्क्यांपर्यंत गेले आहे. त्यामुळे राज्याचे साखर उत्पादन ७.५ टक्के वाढून ८५ लाख टनांऐवजी ९५ लाख टनांपर्यंत जाईल. उपलब्ध जादा उसामुळे ही जादा साखर निर्मिती होणार असून केंद्र सरकारने डिसेंबर २०२३ पूर्वीच्या धोरणानुसार निर्णय घ्यावेत, अशी मागणीही विस्माने केली आहे.
‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे सचिव संजीव चोप्रा यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, राष्ट्रीय इथेनॉल मिश्रण कार्यक्रम राबवताना केंद्राने आधीप्रमाणे निर्णय घ्यावेत. सुरुवातीला इथेनॉल मिश्रण कार्यक्रम व्यवस्थित राबवला जात होता. मात्र, ७ डिसेंबर २०२३ रोजी केंद्राने वेगळा आदेश काढला. त्यामुळे सिरपपासून इथेनॉल तयार करण्यावर बंदी घातली आहे. साखर इथेनॉलकडे वळवणे थांबल्याने इथेनॉल मिश्रण कार्यक्रम अडचणीत आल्याचे साखर उद्योगाचे मत आहे.