शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपीसह प्रतिटन 200 रुपयांची पहिली उचल द्यावी – राजू शेट्टी

कोल्हापूर: यंदाच्या ऊस गळीत हंगामासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपीसह प्रतिटन 200 रुपयांची पहिली उचल द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. ते कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर इथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या 18 व्या ऊस परिषदेत बोलत होते.

शेतकरी संघटनेची 18 वी ऊस परिषद कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरच्या विक्रमसिंह मैदानावर पार पडली. शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस दरावरून आक्रमक पवित्रा घेतला आहे. जयसिंगपूर येथे राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते दाखल झाले होते. कार्यकर्त्यांंनी ‘चळवळ टिकली पाहिजे’ अशा आशयाच्या टोप्या घातल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत पराभव होऊनही परिषदेच्या ठिकाणी कार्यकर्त्यांंत उत्साह होता. यावेळी शेट्टी यांनी अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न मांडून त्यांना घामाचे दाम मिळाले पाहिजे अशी मागणी केली.

शेट्टी यांनी सांगितले की, महापुरात बुडालेल्या ऊसाची कोणतीही कपात न करता प्राधान्याने तोड देण्यात यावी. ज्या साखर कारखान्यांनी अद्याप गेल्या हंगामाची एफआरपी दिलेली नाही त्या कारखान्याच्या संचालकावर फौजदारी गुन्हे दाखल होऊन कारवाई व्हावी. महापुरातील शेतकऱ्यांचे ज्या पद्धतीने कर्ज माफ करण्यात आले आहे, त्याप्रमाणे अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांची कर्जे माफ करण्यात यावीत. शेतकऱ्यांचा सातबारा विनाअट  कोरा  झाला पहिजे. मायक्रो फायनान्समध्ये अडकलेल्या महिलांची थकीत कर्ज त्वरित माफ करण्यात यावीत, कृषी वीज बिल माफ करून १२ तास वीज देण्यात यावी असेही ते म्हणाले.

आम्ही 15 डिसेंबर पर्यंत कारखानदार काय करतात याची वाट पाहणार आहे. 15 डिसेंबर पूर्वी साखर कारखान्यानी मागील हंगामाची उर्वरित रक्कम आणि चालू हंगामातील FRP अधिक 200 रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केले नाहीत तर रस्त्यावरची लढाई लढावी लागेल अस शेट्टी यांनी म्हटले आहे. स्वाभिमानीच्या 18 व्या ऊस परिषदेत केलेल्या मागण्यांवर विचार करून कारखानदार दर देतील का की पुन्हा संघर्ष होईल हें पाहणे महत्वाचे ठरणार आहे

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here