पुणे : येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून (व्हीएसआय) दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. सन २०२३-२४ हंगामासाठी राज्यातील सर्वोत्कृष्ट कारखान्याचा स्व. वसंतदादा पाटील पुरस्कार यंदा अहिल्यानगरच्या अंबालिका शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड या खासगी साखर कारखान्याला मिळाला आहे. तर कडेगाव (सांगली) येथील सासपडे गावचे रामदास पोळ, माढा (सोलापूर)च्या पिंपळनेरचे अमोल लोंढे आणि वाळवा (सांगली) च्या कुरपळचे शिवाजी देवकर यांना राज्यस्तरीय ऊस भूषण पुरस्कार मिळाला आहे. गुरुवारी व्हीएसआयच्या ४८ व्या वार्षिक सभेत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होईल. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील आदी उपस्थित असतील.
अंबालिका शुगर्सला दोन लाख ५१ हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात येईल. तर एक लाख रुपये व मानचिन्ह असा स्व,. विलासरावजी देशमुख सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार जालना जिल्ह्यातील अंबडच्या कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याला मिळाला. स्व. रावसाहेबदादा पवार सर्वोत्कृष्ट आसवनी पुरस्कार कळंबच्या (जि. धाराशिव) नॅचरल शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज साखर कारखान्याने मिळवला आहे. तर ऊस विकास व संवर्धनासाठीचा स्व. डॉ. अप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील पुरस्कार कागल (जि. कोल्हापूर) येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याला जाहीर झाला.
सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन पुरस्कार दौंड शुगर कारखान्याने तर सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनाचा पुरस्कार बारामतीच्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याला मिळाला. उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनात दक्षिण विभागात यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने तर मध्य विभागात बारामती येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्याने बाजी मारली. उत्तरपूर्व विभागात कळंबच्या नॅचरल शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज, ऊस विकास व संवर्धनात दक्षिण विभागात कोल्हापूरच्या दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना, मध्य विभागात भीमाशंकर सहकारी साखर कारखाना आणि उत्तर पूर्व विभागात हिंगोली जिल्ह्यातील पूर्णा सहकारी साखर कारखान्याने पुरस्कार मिळवला आहे.