इथेनॉलप्रश्नी दोन दिवसांत तोडगा काढण्याचे अमित शहांकडून आश्वासन : उपमुख्यमंत्री अजित पवार

नागपूर : केंद्र सरकारने इथेनॉल उत्पादनासाठी ऊस वापरण्यावर बंदीचा निर्णय अचानकपणे घेतला. देशातील अनेक साखर कारखान्यांनी इथेनॉल प्लँट उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. त्यामुळे इथेनॉल उत्पादनाबाबत निर्माण झालेल्या पेचावर केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी दोन दिवसांत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिली. नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात इथेनॉल उत्पादनावरील निर्बंधाचे पडसाद उमटले. केंद्राच्या या निर्णयाचा महाराष्ट्रातील साखर उद्योगावर विपरित परिणाम होईल, असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.

उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याशी मी या विषयावर चर्चा केली आहे. केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्याशीही बोलणे झाले आहे. त्यांनी मला येत्या दोन दिवसांत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. अनेक साखर कारखान्यांनी ५ टक्के भांडवल आणि ९५ टक्के निधी कर्ज घेवून इथेनॉल प्लांट उभारले आहेत. त्यामुळे तोडगा निघाला नाही, तर आम्ही दिल्लीला जाऊन शहा यांच्याशी या विषयावर चर्चा करू. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या निदर्शनास या अडचणी आणून दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here