सहारनपूर : योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशला भ्रष्टाचाराच्या मार्गावरून बाहेर आणून विकासाच्या मार्गावर नेले आहे असे सांगत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या कामकाजाचे कौतुक केले. यापूर्वी उत्तर प्रदेशात साखर कारखाने बंद करणे आणि ते कमीत कमी दरात विक्री करण्याचे षङयंत्र रचले गेले होते. आता उत्तर प्रदेशचा पूर्व भाग असो वा पश्चिम… भाजपचे योगी सरकार अस्तित्वात आल्यानंतर एकाही कारखान्याची विक्री केली गेली नाही. एकही कारखाना बंद केलेला नाही. तर नवे कारखाने सुरू केले जात आहेत, असे शहा यांनी सांगितले.
शहा म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला जगभरात सन्मान मिळवून दिला आहे. योगी यांनी उत्तर प्रदेशला भ्रष्टाचाराच्या मार्गावरून हटवून विकासाच्या मार्गावर आणले आहे.
सहारनपूरमध्ये एका जाहीर सभेत बोलताना शहा म्हणाले, योगी यांनी मला या पवित्र आणि ऐतिहासिक भूमीवर शाकुंभरी देवीच्या नावे विद्यापीठ स्थापनेच्या कोनशीला समारंभाला आमंत्रीत केले हा माझा सन्मान समजतो. पूर्वी दिल्लीला सहारनपूरहून पोहोचायला ८ तास लागायचे. आता केवळ तीन तासात अंतर पूर्ण होतो. चांगले रस्ते असल्याने अंतर कमी झाले आहे. फक्त रस्त्याचे अंतर नव्हे तर पंतप्रधान मोदी यांच्यामुळे हृदयातील अंतरही कमी झाले आहे, असे शहा म्हणाले.