बुरहानपूर: नवल सिंह सहकारी साखर कारखाना आता ऊस लागवडीला शेतकऱ्यांना एकरी पाच हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देणार आहे. सहकारी क्षेत्राला नवा आयाम देणाऱ्या या कारखान्याला केवळ बुरहानपूरच नव्हे तर शेजारील महाराष्ट्र राज्यातील शेकडो शेतकरीही जोडले गेले आहेत.
कारखान्याचे अध्यक्ष किशोरी देवी यांनी सांगितले की, कारखान्याचे व्यवस्थापन सुरळीत होण्यासाठी ऊस लागवड क्षेत्र वाढणे अत्यंत गरजेचे आहे. कारखाना यंदा इथेनॉलचे उत्पादनही करणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारची परवानगी मिळाली आहे. ऊस पिकाचे नुकसान होण्याची शक्यता खूप कमी असते.
नवी दुनियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कारखान्याच्या अध्यक्षांनी शेतकऱ्यांना ऊस लागवड करण्याचे आवाहन केले आहे. कमी पाण्यातही ठिबक पद्धतीने याचे उत्पादन घेतले जाऊ शकते. जे शेतकरी उसाची १५ जुलै ते ३१ मार्च या कालावधीत लागवड करतील अशा शेतकऱ्यांना कारखान्याच्यावतीने प्रोत्साहन अनुदान दिले जाईल अशी घोषणा अध्यक्षांनी केली आहे. याबाबत अधिक माहिती हवी असल्यास शेतकऱ्यांनी किसान साखर कारखान्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.