विशाखापट्टणम् : आंध्र प्रदेश आणि दक्षिण भारतातील सर्वात मोठ्या अनाकापल्ले येथीळ गुळ बाजारात गुळाच्या आवकेत घट होत असल्याने येथील बाजारपेठ हळूहळू आकसत आहे. गेल्या हंगामाच्या तुलनेत चालू हंगामात गुळाच्या आवकेत ३० ते ४० टक्क्यांची घट झाली आहे. अनाकापल्ले जिल्हा आणि आसपासच्या विभागातील गुळ उत्पादन युनिट्स ऑक्टोबरपासून सुरू होतात. आणि डिसेंबर ते एप्रिल या कालावधीत मोठ्या प्रमाणात गुळ बाजारात दाखल होतो.
या हंगामात दररोज सरासरी ६,००० ते ८,००० ढेपा गुळ येत आहे. गेल्या हंगामात एका दिवसाला सरासरी १० ते १४ हजार ढेपा गुळाची आवक सुरू होती. आगामी काही वर्षे गुळाच्या आवकेत घसरण सुरू राहण्याची शक्यता आहे. अनाकापल्ले आणि आसपासच्या परिसराची अर्थव्यवस्था गुळ व्यापारावर अवलंबून आहे. जर गुळाच्या बाजारपेठेत आवकेत घसरण झाली तर या भागाची अर्थव्यवस्था कोलमडेल. गुळ व्यापाऱ्यांनी सांगितले की, अनकापल्ले आणि विजयनगरम जिल्ह्याच्या काही भागातील ऊस उत्पादक शेतकरी आणि गुळ उत्पादक हे इतर पिकांकडे वळत असल्याने गुळ उत्पादनात घसरण सुरू आहे.
अनाकापल्ले गूळ बाजाराच्या सचिव डी. शकुंतला यांनी सांगितले की, ऊस शेतीचे काही प्रमाणात घटलेले क्षेत्र आणि गुळ उत्पादकांकडून युनिट्स बंद करण्यात येत असल्याने उत्पादनात घसरण झाली आहे. गुळ उत्पादक शेतकरी प्रती १०० किलो गुळाचा एमएसपी ५००० रुपये करण्याच्या घोषणेची प्रतीक्षा करीत आहेत. सद्यस्थितीत विशेष गुणवत्तेच्या गुळासाठी ४,२०० रुपये प्रती १०० किलो, सोनेरी रंगाच्या गुळासाठी ३६५० रुपये, करड्या रंगाच्या गुळासाठी ३५३० रुपये आणि काळ्या गुळासाठी ३०८० रुपये मिळत आहेत. ऊस उत्पादक शेतकरी हळूहळू इतर पिकांकडे वळत आहेत