चित्तूर : रायलसीमामध्ये सातत्याने पाऊस सुरू असल्याने गुळाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. स्थानिक नद्या, नाले जोरदार पावसामुळे भरून वाहत असल्याने या भागातील गुळाचे उत्पादन थांबले आहे. पावसामुळे गेल्या तीन आठवड्यांपासून, चित्तूर जिल्ह्यात गूळ निर्मिती करणारी बहुतांश युनिट बंद आहेत.
गुऱ्हाळघरांसाठी उसाच्या चिपाडांचा वापर जळण म्हणून केला जातो. उसाचा रस घट्ट होण्यासाठी खूप कालावधीत लागतो. सध्याच्या पावसामुळे कोणत्याही गूळ उत्पादन युनिटकडे उसाची वाळलेली चिपाडे शिल्लक नाहीत. त्याचा परिणाम गुऱ्हाळावर झाला आहे. चित्तूर जिल्ह्यातील मार्केट यार्डात दररोज १५० मेट्रिक टन गूळ विक्रीस येतो.
खरेतर चित्तूर जिल्ह्यात भुईमूगनंतर ऊस हे दुसरे महत्त्वाचे पिक आहे. जिल्ह्यात जवळ १३,००० हेक्टर क्षेत्रात ऊस पिके घेतले जाते. गुळाच्या निर्मितीसाठी केवळ १.५० लाख टन ऊस शेतकऱ्यांनी पाठवला आहे. नेहमी १० टन उसापासून एक टन गुळाची निर्मिती होते. शेतकऱ्यांकडून हंगामात जवळपास १५,००० टन गुळाचे उत्पादन केले जाते. त्यामध्ये काळा आणि इतर प्रकारच्या गुळाचा समावेश आहे. नोव्हेंबर महिन्यात १५ दिवस झालेल्या पावसाने गुळाचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे अनेक कामगार बेरोजगार झाले आहेत.