आंध्र प्रदेश : निंद्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पाठबळ देण्याचे टीडीपीचे आश्वासन

तिरुपती : तेलगू देशम पक्ष निंद्रा येथील संकटग्रस्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहिल, असे पार्टीचे महासचिव नारा लोकेश यांनी शेतकऱ्यांना सांगितले. बंद पडलेल्या साखर कारखान्याने आधी खरेदी केलेल्या येथील ऊसाची बिले अद्याप थकीत आहेत. लोकेश यांच्या ‘युवा गलम’ अभियानाने मंगळवारी चित्तूर जिल्ह्यातून तिरुपती जिल्ह्यात प्रवेश केला.

ऊस शेतीबाबत समृद्ध मानल्या जाणाऱ्या सत्यवेदू निवडणूक मतदारसंघातील निंद्रा विभागात आपल्या पदयात्रेदरम्यान शेतकऱ्यांनी लोकेश यांच्याकडे आपली थकीत बिले मिळवून देण्यासाठी मदत करण्याची विनंती केली होती. शेतकऱ्यांनी सांगितले की, निंद्रा साखर कारखान्याकडे ३७ कोटी रुपयांची बिले थकीत आहेत. हे पैसे देण्यापूर्वीच कारखान्याने आपले कामकाज बंद केले. त्याचा फटका ४,००० शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्यांनी सांगितले की, वायएसआर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी डिसेंबर २०२१ पर्यंत कारखाना पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, काहीच घडलेले नाही. कारखान्याने दोन मंत्री आणि सहा आमदारांचा समावेश असलेल्या मोठ्या मतदारसंघातून ऊस खरेदी केला. मात्र, शेतकरी आजही बिले मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर लोकेश यांनी कारखान्याकडून व्याजासह थकबाकी मिळवून देऊ असे आश्वासन दिले. भविष्यात ऊस उत्पादकांसाठी लाभदायी दर देण्याची नवी योजनाही तयार केली जाईल असे सांगितले. संपूर्ण चित्तूर जिल्ह्यात किमान पाच कारखाने गेल्या एका दशकात बंद पडले होते. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. श्री लोकेश यांनी ते पुन्हा सुरू करण्यासाठी पावले उचलली जातील असे आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here