बिजनौर : बिलाई साखर कारखान्याची थकीत ऊस बिले, विजेसह विविध समस्यांबाबत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी तेथे आलेले साखर कारखान्याचे सरव्यवस्थापक, जिल्हा ऊस अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी आपल्याजवळ बसवून त्यांना घेराव घातला. शेतकऱ्यांची थकीत बिले द्यावीत, तरच या अधिकाऱ्यांची सुटका केली जाईल असा इशारा राष्ट्रीय शेतकरी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद कुमार बिट्टू यांनी दिला. शेतकऱ्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अनेक तासानंतर कारखान्याकडून १४ कोटी रुपये व उर्वरीत थकीत बिले लवकरच देण्याच्या अश्वासनानंतर शेतकरी शांत झाले.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार राष्ट्रीय शेतकरी कामगार संघटनेच्या वतीने बुधवारी शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आले. त्यांनी मेळाव्यात कारखान्याकडील थकीत बिले, विजेची समस्या मांडली. आगामी हंगामात ४५० रुपये क्विंटल दर द्यावा अशी मागणी केली. कारखान्याने थकीत बिले न दिल्यास आम्ही ऊस इतर कारखान्याला पाठवू असा इशारा शेतकऱ्यांनी यावेळी दिला.
महासंघाचे पश्चिम प्रदेश महासचिव कैलाश लांबा, जिल्हाध्यक्ष विनोद कुमार आदींनी आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका मांडली. जिल्हा ऊस अधिकारी पी. एन. सिंह, जीएम परोपकार यांना घेराव घालण्यात आला. आश्वासनानंतर त्यांची सुटका करण्यात आली. यावेळी राजपाल सिंह भगत, देवेंद्र बिट्टू, रोहित कुमार राठी, प्रदीप चेयरमन, संदीप प्रधान, महेंद्र सिंह, संजीव सिंह, भोगेंद्र सिंह, राकेश कुमार, ठाकुर नरेंद्र सिंह आदी उपस्थित होते.