कोल्हापूर : केनवडे (ता. कागल) येथे अन्नपूर्णा शुगरच्या पाचव्या गळीत हंगामाचा शुभारंभ पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व संस्थापक अध्यक्ष संजय घाटगे, ‘गोकुळ’चे संचालक अंबरिषसिंह घाटगे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. सत्यनारायण पूजा संचालक सौ. व श्री. राजेश भराडे यांच्या हस्ते झाली. यावेळी योग्य नियोजनामुळे यंदा कारखाना अडीच लाख मेट्रिक टन गाळपाचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण करेल, असा मला विश्वास वाटतो असे संस्थापक अध्यक्ष घाटगे यांनी सांगितले. अरुण इंगवले, दत्ताजीराव घाटगे, राहुल देसाई, विकास पाटील, प्रकाश पाटील प्रमुख उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, संजय घाटगे यांनी अनंत अडचणींवर मात करून कारखाना उभा करून तो यशस्वीपणे चालवत आहेत. १५ किलोमीटरच्या हवाई अंतराची अट रद्द करण्याचा निर्णय लवकरच मंत्रिमंडळात होईल. त्यानंतर अन्नपूर्णा कारखाना दररोज अडीच हजार टन क्रशिंग गाळप करेल. कारखान्याच्या उन्नतीसाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून सक्षमपणे आर्थिक सहकार्य करणार आहे. यावेळी अंबरीष घाटगे, अरुंधती घाटगे, सुयशा घाटगे, भैया दिंडोर्ले, रवी सावडकर, धनाजी गोधडे, वीरेन घाटगे, विश्वास पाटील, के. बी. वाडकर, सूर्यकांत मर्दाने, साताप्पा तांबेकर, ज्ञानदेव पाटील, अशोक पाटील, किरण पाटील, आर. के. कुंभार, सिद्राम गंगाधरे आदी उपस्थित होते. धनराज घाटगे यांनी स्वागत केले, रमेश जाधव यांनी सूत्रसंचालन केले. रणजित मुडूकशिवाले यांनी आभार मानले.