पुणे:राज्य सरकारने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना एक जुलैपासून पुसदपासून वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती अभियान सुरू करणार आहे.बारामतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची दोन दिवसांची बैठक रविवारी संपली.त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी ही पत्रकारांना याची माहिती दिली. यावेळी सतीश काकडे, राजेंद्र ढवाण, अमर कदम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.राज्य कार्यकारिणीमध्ये १५ ठराव करण्यात आले आहेत असेही सांगण्यात आले.
माजी खासदार शेट्टी म्हणाले की, कर्जमाफीसह संपूर्ण वीजबिल माफीचीही मागणी आम्ही केली आहे. गाईच्या दुधाला लिटरला सात रुपये अनुदान द्यावे, पामतेल व सोयाबिन पेंडीच्या आयातीवर ४० टक्के कर लावावा, कांदा निर्यातीवर शून्य टक्के कर असावा, उसाची एफआरपी एकरकमी मिळावी, पाणीपट्टीतील दहापट दरवाढ त्वरित मागे घ्यावी, कृषी पंपांना मीटर बसवण्याचा निर्णय मागे घ्यावा, रासायनिक खतांचे दर कमी करावेत, शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे तातडीने द्यावेत, अशा मागण्या स्वाभिमानाने केल्या आहेत.