कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेले आप्पासाहेब नलवडे साखर कारखाना कामगारांचे कामबंद आंदोलन अखेर स्थगित झाले. कारखाना कर्मचारी आणि संचालक मंडळ यांच्यात सुवर्णमध्य निघालाने आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी कारखान्याचे चेअरमन डॉ. प्रकाश शहापूरकर, उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्यासह साखर कामगार संघाचे अध्यक्ष विजय रेडेकर, उपाध्यक्ष श्रीकांत नार्वेकर आदी उपस्थित होते.
आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याच्या कामगारांनी थकीत पगार आणि भविष्य निर्वाह निधीसाठी ११ जुलै २०२३ पासून कामबंद आंदोलन सुरु केले होते. कारखाना प्रशासनाकडून आगामी गाळप हंगामाची तयारी सूर असताना कामगारांनी आंदोलनाचे हत्यार उपसल्याने प्रशासनापुढे पेच निर्माण झाला होता. या प्रश्नावर मागील आठवड्यात संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत कामगारांशी चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात होता.
काय होत्या कामगारांच्या मागण्या ?
मे २०२१ ते मे २०२३ अखेरचा कामगारांचा पगार थकीत आहे. ऑक्टोबर २०२० पासून मे २०२३ पर्यंतची कामगारांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरलेली नाही. हंगामी कर्मचाऱ्यांना तीन वर्षांचा रिटेन्शन अलाउन्स आणि त्यावरील भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळालेली नाही. आर्थिक अडचणीत सापडलेल्या कामगारांना थकीत पगारापैकी ७ पगार आणि चालू हंगामातील थकीत पगारापैकी ५ पगार द्यावेत, भविष्य निर्वाह निधीची रक्कम तातडीने भरावी, हंगामी कामगारांचा वर्षाचा रिटेन्शन अलाउन्स द्यावा.