ऊसाच्या दुष्काळ प्रतिकारक वाणांच्या लागवडीचे आवाहन

लखनऊ: सूचनेनुसार हवामानात सातत्याने होत असलेल्या बदलांची स्थिती लक्षात घेऊन भारतीय ऊस संशोधन संस्थेने (आयआयएसआर) दिलेल्या शिफारशींनुसार उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस लागवडीचे नियोजन करावे असे आवाहन उत्तर प्रदेशचे ऊस आयुक्त संजय आर. भूसरेड्डी यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी दुष्काळ प्रतिकारक वाण निवडावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

याबाबत माहिती देताना श्री. भूसरेड्डी म्हणाले, नगदी पीक असल्याने राज्यातील बहूतांश शेतकरी ऊस पिकवतात. याचे क्षेत्र अधिक आहे. दरवर्षी ऊस पिकाला पूर अथवा दुष्काळ अशा दोन्ही प्रकारच्या नुकसानीला सामोरे जावे लागते. त्यामुळे ऊस हंगामाची लागवड आणि तोडणी या दोन्हींत अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे ऊस पीक घेताना खबरदारी आणि सुरक्षेचे उपाय लक्षात घेऊन हवामानातील बदलांतून होणाऱ्या नुकसानीपासून बचाव करणे शक्य आहे. ज्या भागामध्ये दुष्काळाची शक्यता आहे अथवा पावसाळ्यातही दीर्घकाळ पाऊस पडत नाही, अशा ठिकाणी दुष्काळाला प्रतिकार करणाऱ्या वाणांची निवड करावी लागेल. यासाठी को. एलके ९४१८४, को. एलके १२२०९, कोएस ०८२७९ अशा जातींची लागवड करावी लागेल. या वाणांच्या लागवडीनंतर ऊसात पाचट टाकण्यासह वारंवार पिकाला पाणी देण्याची गरज भासत नाही, असे श्री. भूसरेड्डी म्हणाले.

शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाची पद्धत अवलंबली तर पाण्याच्या बचतीसह उत्पादनात अधिक भर पडते. जर उसाचा पाला उन्हाळ्यात विलग होत असेल, तर पाणी देण्यापूर्वी पिकाला पोटॅश उर्वरकाच्या ५ टक्के मिश्रणाची फवारणी केल्यास तीव्र उन्हापासून होणारे नुकसान कमी होईल. पुरासारख्या स्थितीच्या काळात को. एलके ९४१८४, कोसा ९५३०, कोसा ९६४३६, कोएलके १२२०७ या वाणांची शिफारस केली आहे. पूर येणाऱ्या क्षेत्रामध्ये उसाची लागवड सप्टेंबर ते डिसेंबर या शरद ऋतुच्या कालावधीत करणे उत्तम ठरते. जर या काळात लागवड केली गेली नाही तर फेब्रुवारी ते एप्रिल या वसंत ऋतुच्या कालावधीत ऊसाची लागवड करता येईल असे ऊस आयुक्त श्री. भूसरेड्डी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here