मुंबई, ९ नोव्हेंबर: सर्वोच्च न्यायालयात कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला रामजन्मभूमी विवादाचा निकाल उद्या अपेक्षित असून, या निकालाचा सर्वांनी सन्मान करावा आणि शांतता व सलोखा राखण्यास मदत करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
या प्रकरणातील सर्व बाजू आणि सर्व पक्षांना ऐकल्यानंतरच आता हा निकाल सर्वोच्च न्यायालय देणार आहे. या निकालानंतर समाजामध्ये सलोखा राखणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. कुणाच्याही भावना दुखावणार नाहीत, अशाच प्रकारे आपली अभिव्यक्ती असली पाहिजे. या निकालाचा सर्वांनी सन्मान करावा आणि संयम राखून कायदा-सुव्यवस्था राखण्यास योगदान द्यावे. कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये. राज्य सरकार सर्व यंत्रणांच्या संपर्कात आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.