सातारा : सध्या साखर आयुक्तांच्या आदेशाने रयत सहकारी साखर कारखान्याच्या सभासद भागाची वाढीव दर्शनी रक्कम भरून भाग पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याबाबत कारखान्याने सभासदांना नोटिसीद्वारे कळवले आहे. मात्र काही सभासदांना नोटीस प्राप्त झालेल्या नाहीत. त्यांनी त्या प्राप्त करून घ्याव्यात व आपली शेअर्सची वाढीव रक्कम भरणा करून आपला सभासदत्वाचा हक्क व अधिकार अबाधित ठेवावा. सभासदांना अडचणी येत असतील तर त्यांनी साखर आयुक्त किंवा सहकारी संस्थांच्या उपनिबंधकांशी संपर्क साधावा, असे आवाहन कारखान्याचे माजी चेअरमन जयसिंगराव पाटील यांनी केले. कराड येथे माजी जिल्हा परिषद सदस्य आनंदराव पाटील यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद झाली. त्यावेळी ते बोलत होते.
जयसिंगराव पाटील म्हणाले की, सहा दशकांपूर्वी सर्व ऊस उत्पादकांना न्याय मिळत नसल्याने कै. विलासराव पाटील यांच्या प्रयत्नाने डोंगरी भागामध्ये साखर कारखाना उभारण्याचे प्रयत्न झाले. तत्कालीन हवाई अंतराच्या नियमामुळे अडचणी आल्या. अखेर शेवाळेवाडी (म्हासोली) च्या प्रतिकूल ठिकाणी जागा निश्चित झाली. १९९६ ला कारखान्याला इरादा पत्र मिळाले. त्यानंतल नोंदणी व सन १९९८ ला परवाना मिळाला. कारखान्यासाठी १५० एकर क्षेत्र खरेदी करण्यात आले. अवघ्या १३ महिन्यांत ४० ते ४५ कोटींमध्ये कारखाना उभारला आहे. कराड पाटण तालुक्यातील ८५ गावांचे कार्यक्षेत्र कारखान्याला आहे. खडतर परिस्थितीत १६ नोव्हेंबर २००१ ला चाचणी हंगाम घेतला गेला. सभासदांचे हक्क अबाधीत राहावेत यासाठी शेअर्सची पूर्ण रक्कम भरणे गरजेचे आहे.