लातूर : येथील श्री संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. संचालकपदाच्या १६ जागांसाठी ४ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. कारखान्याचे ७,००० सभासद असून पाच गटांतील ७६ गावांतील हे मतदार आहेत. कारखाना ताब्यात घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काँग्रेस, भाजप, शिवसेना या पक्षांच्या पॅनलमध्ये लढत रंगण्याची शक्यता आहे.
साखर कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, ४ ते ८ डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. छाननीनंतर १२ ते २६ डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. ७ जानेवारी रोजी कारखान्यााठी मतदान होईल. ८ जानेवारी रोजी मतमोजणी आणि निकाल जाहीर होईल. २००० साली स्थापन झालेल्या कारखान्याचा २००२ पासून गळीत हंगाम सुरू झाला. सलग पाच वर्षे कारखाना सुरू राहिला होता. मात्र, कमी ऊस, अत्यल्प पाऊस यांसह विविध कारणांनी कारखाना बंद होता. गेल्या दोन वर्षापासून कारखाना सुरू आहे. आतापर्यंत कारखान्याने ४६ हजार टन उसाचे गाळप करून ४५ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे.