पुणे : साखर आयुक्तालयातील कृषी सहसंचालकपदी (विकास) अमरावती येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील अधीक्षक कृषी अधिकारी महेश झेंडे यांची बदली करण्यात आली आहे. त्यामुळे साखर आयुक्तालयातील गेली दोन वर्षे रिक्त असलेल्या सहसंचालक पदावर अखेर पूर्णवेळ अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. साखर आयुक्तालयात सहसंचालक (विकास) या पदावर शासनाकडून प्रतिनियुक्ती केली जाते. ऊस गाळप परवान्यापासून ते कारखान्यांची आवश्यक माहिती, केंद्र सरकारला द्यावयाचे विविध अहवालाबरोबरच उसासाठी ठिबक सिंचनचा अधिक वापरासाठी सहसंचालक पद महत्त्वाचे आहे.
पुणे विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील रिक्त असलेल्या अधीक्षक कृषी अधिकारी पदावर सिंधुदुर्ग येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांची बदली करण्यात आली. कोल्हापूर येथील रिक्त जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीपदी रत्नागिरी येथील आत्मा विभागाचे प्रकल्प संचालक जालिंदर पांगरे यांची तर गडचिरोलीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांची कोल्हापूर येथील रामेतीच्या प्राचार्यपदी बदली करण्यात आली. अहमदनगर येथील रिक्त असलेल्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीपदी महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळाचे प्रकल्प व्यवस्थापक सुधाकर बोराळे यांची बदली झाली आहे.